कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटते, उत्साही वाटते असं आपण अनेकदा म्हणतो . मात्र, आता याच कॉफीमुळे लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसना उर्जा मिळणार आहे. लंडन शहरातील सार्वजनिक वाहतूकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर केला जात आहे. लंडनमध्ये कालपासून या खास गोष्टीची चर्चा सुरु आहे. कॉफीच्या कचऱ्यापासून काढण्यात आलेले तेल डिझेलमध्ये मिसळून त्याचे जैव इंधनात रुपांत केले जाते. हेच जैव इंधन सार्वजनिक बसेसमध्ये वापरले जात आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. जर या प्रयोग यशस्वी झाला तर हेच इंधन इतर वाहनांसाठीही वापरता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लंडनमधील ‘बायो-बीन लिमिटेड’ या कंपनीने एका वर्षाच्या कालावधीसाठी कॉफीच्या कचऱ्यापासून बनवलेल्या तेलाचा साठा बस चालवण्यासाठी तयार करुन ठेवला आहे. लंडनमध्ये सार्वजनिक बस सेवेचे काम पाहणाऱ्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ने कमीत कमी प्रदूषण होण्याच्या दृष्टीने कमी धूर उत्सर्जित करणाऱ्या आणि जैव इंधनावर चालणाऱ्या बसेसच्या वापराला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
लंडनवासीयांच्या कॉफी सेवनानंतर उरलेल्या चोथ्यामधून वर्षभरात 2 लाख टन कचरा निर्माण होतो. हाच कचरा कंपनी कॉफीची दुकाने आणि कॉफीवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडून विकत घेऊन त्यापासून तेल काढते. त्यानंतर कॉफीच्या कचऱ्याचे हे तेल बी20 या जैव इंधनामध्ये मिसळले जाते. टाकाऊ कचऱ्यापासून आपण इंधन निर्मिती करु शकतो याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. या पर्यावरणपुरक उपक्रमाचे लंडनवासियांनी स्वागत केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews